याआधी नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’साठी लोकांकडून सूचना, संकल्पना तसंच विषय मागवले होते. नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं होतं. योगायोगाने ३१ मे रोजीच लॉकडाउन संपत असल्याने नरेंद्र मोदी लॉकडाउन उठवणार का ? की लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होईल याकडे देशाचं लक्ष आहे.
दरम्यान शुक्रवारी अमित शाह यांनी लॉकडानच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील विविध आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली. टाळेबंदीच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात कोणत्या व्यवहारांना मुभा द्यायची यावर केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. देशभरात २४ मार्च, १५ एप्रिल, ३ मे आणि १७ मे असा चार वेळा लॉकडाउन जाहीर केला गेला. या काळात करोनासंदर्भातील सर्व निर्णय राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत घेण्यात आले. लॉकडाउनच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात या कायद्याची अंमलबजावणी कायम ठेवायची की, राज्यांना अधिकार द्यायचे यावर केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने हा कायदा लागू न केल्यास करोनासंदर्भातील सर्व निर्णय राज्यांना घ्यावे लागतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेतली. महाराष्ट्राने जूनमध्येही टाळेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटक सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली असली तरी, अन्य राज्यांतील प्रवाशांना येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाने दिल्लीची सीमा बंद केली आहे.
0 Comments