संत तुकाराम
मूळ नाव - तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म - इ.स.१६०८, माघ शुद्ध (वसंत)
पंचमी,देहू, महाराष्ट्र
निर्वाण - फाल्गुन कृ.२, शके १५७१, [१९
मार्च १६५०],देहू, महाराष्ट्र
'गुरू - बाबाजी चैतन्य
साहित्यरचना - तुकारामाची गाथा
कार्य - समाजसुधारक, कवी, विचारवंत,
लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे - देहू
वडील - बोल्होबा अंबिले
आई - कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी- आवली
अपत्ये - महादेव, विठोबा, नारायण,
भागूबाई
संत तुकाराम (ऊर्फ तकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता अभंग आहे, वाढतेच आहे. भागवत धर्माचा कळस होण्याचेमहद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्याच्या अभंगाचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
बालपण ते प्रापंचिक जीवन
संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्यानजीक असलेल्या देहु या गावात झाला. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचा मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. लहानपणी चेंडूफळी, हुंबरी, हुतूतू, विटीदांडू इ. अनेक खेळ ते खेळले असावेत. टिपऱ्या, हमामा, फुगड्या इ. खेळही त्यांनी रस घेऊन पाहिले असावेत. क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग त्यांनी रचिले आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथेइतके खेळांचे वैविध्य अन्य संतांच्या गाथांत आढळत नाही.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला; परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या आप्पाजी गुळवे ह्यांच्या अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीच जिजाई.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला.
भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे गेली. घरी अठरा विश्वे दारिद्र्य आले.
परमार्थाची वाटचाल
तुकारामांचे वडील बंधू सावजी हे स्वतःची पत्नी वारल्यानंतर विरक्त बनून तीर्थाटनास निघून गेले ते पुन्हा परतले नाहीत. त्यामुळे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी व्यवसायासह सर्व प्रपंचाचा भार तुकारामांवर येऊन पडला. त्यानंतर १६३०–३१ मध्ये महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडला त्यात त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबरच त्यांचा मुलगाही मरण पावला; दुकानाचे दिवाळे निघाले; दारिद्र्य आले. ह्या स्थितीमुळे जनातील मान गेला. अपमान होऊ लागले. त्यामुळे अनन्यगती होऊन ते देवाला शरण गेले. नवा जीवनमार्ग त्यांना स्पष्ट दिसू लागला. लहानपणापासून झालेले अध्यात्मविद्येचे संस्कार जागृत होऊन त्यांना उपरती झाली. अभ्यासाची ओढ लागली. ते एकांतवासात रमू लागले. देहूच्या परिसरात सह्याद्रीचे अनेक उंच उंच रम्य पहाड आहेत. त्यांवर जाऊन वाचन–मनन–चिंतनात ते गढून जाऊ लागले देहूच्या उत्तरेस असलेल्या भामनाथ किंवा भामचंद्र डोंगरावरील लेण्यात ते बसू लागले. ह्याच ठिकाणी त्यांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवदिकांच्या गाथा, योगवासिष्ठ, रामायण, दर्शने इत्यादिकांचा व्यासंग केला. प्रिया, पुत्र, बंधू ह्यांचा संबंध मनातून तुटला. दुकानात बसून केवळ कुटुंबाच्या आणि देहाच्या धारणेपुरते मिळवण्यावर ते संतोष मानू लागले मनाच्या आणि इंद्रियांच्या विकारांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. संतांचा, हरिभक्तांचा सहवास त्यांना मिळत गेला.
संत तुकाराम महाराजांना त्यांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नदृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला. पांडुरंगावरील निस्सिम भक्तीमुळे त्यांची वृत्ती विठ्ठलचरणी स्थिरावू लागली. पुढे मोक्षाची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या पर्वतावर एकांतात ईश्वरसाक्षात्कारासाठी निर्वाण मांडले. तिथे पंधरा दिवस अखंड एकाग्रतेने नामजप केल्यानंतर त्यांना दिव्य अनुभव प्राप्त झाला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंब
ले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला
। विठोबा भेटला निराकार।।
कवित्वाची स्फूर्ती
गुरूपदेश झाल्यावर कवित्वाची स्फूर्ती झाली. संत नामदेवांनी पांडुरंगासवे स्वप्नात येऊन जागे केले आणि कवित्व करावयास सांगितले.
नामदेवांची शतकोटी अभंगांची संख्या अपुरी राहिली आहे, ती पूर्ण कर, असे पांडुरंगाने सांगितले . तुकाराम अभंग लिहू लागले. संसार–परमार्थाच्या अनुभवांतून निष्पन्न झालेला विचार रम्य शब्दरूप घेऊ लागला. शब्दांची रत्ने आणि शस्त्रे त्यांना गवसली .
त्यांच्या अभंगांत शब्दांची रत्ने जशी दिसतात, तसेच चमत्कार दाखविणारे बाबालोक भविष्यशकुन सांगणारे, त्यांचे अपधर्म पाखंड, धार्मिक, कर्मकांड वा थोतांड इत्यादिकांचे परखड खंडन करणारी शस्त्रास्त्रेही आढळतात. त्यांच्या शैलीचेच सूत्र उपर्युक्त अभंगातून त्यांनी बोलून दाखविले आहे. अभंगांतून स्वतःचा उल्लेख ते तुका असा करतात.
जीवनातील घटना
तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली.
या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते..
अभंगांची रचना
तुकारांमांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.
लोकांकडून त्रास
आपल्या जीवनातून आणि अभंगांतून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनांचा आणि प्रतिष्ठित, सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला.
ब्रह्मसाक्षात्कारी महान संतकवी म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रात पसरली होती.
लोकांच्या स्तुतीमुळे आपला झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय, अशीही त्यांना भीती वाटू लागली होती. तथापि मोहाचा तो टप्पाही त्यांनी ओलांडला. मी आहे मजूर विठोबाचा असे ते लोकांना सांगू लागले. तथापि त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्जनही वाढत होते. सालोमालो हे कीर्तनकार, मंबाजीबुवा, देहूगावाचा पाटील हे त्यांत प्रमुख होते.
गाथा तरला
सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.
तुकोबा शूद्र असून वेदान्तोपदेश करतात, हा मत्सरग्रस्त विरोधकांचा त्यांच्यावर मुख्य आरोप होता. ते स्त्रियांना नादी लावतात असाही आरोप असल्याचे तुकोबांच्या अभंगांतून सूचित होते.
नाना प्रकारे ह्या लोकांनी तुकोबाचा छळ केला. त्यांच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या. त्या कोरड्याच्या कोरड्या वर आल्याचा उल्लेख काही अभंगांत आलेले आहेत .
बहिष्काराचाही प्रयोग
तुकोबांवर बहिष्काराचाही प्रयोग करण्यात आला होता असे अभंगांतून समजते. मंबाजीने तर पुण्यातील विख्यात राजयोगी आपाजी गोसावी ह्यांस पत्र पाठवून ह्या शूद्राचा ब्राह्मणसुद्धा अ नुग्रह घेत असल्याची तक्रार केली होती आणि आपाजी गोसावी ह्यांनी तुकारामांना शिक्षा देण्याचा निश्चय केला होता, ही हकीकत बहिणाबाईंच्या अभंगांत आलेली आहे. तुकोबांनी ह्या सर्व संकटांना तोंड दिले.
वैकुंठ गमन
श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते, परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्या वेळी आनंदावस्थेत त्यांना स्वतःसाठी काहीही प्राप्त करावयाचे नव्हते.
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।
अशा अवस्थेत ते होते. आपल्या भक्तीबळावर आकाशाएवढ्या झालेल्या संत तुकारामांनी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सदेह वैकुंठगमन केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
भक्ती - शक्ती भेट
तुकोबांची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. त्यांनी तुकोबांना दिवटया, छत्री घोडे आणि जडजवाहीर सेवकाबरोबर पाठवून दिले.
तुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोबत चार अभंगांचे पत्र देऊन तो नजराणा शिवाजी राजांकडे परत पाठविला. दिवटया, छत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत .
तुकोबांच्या ह्या निरपेक्षतेच शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटलं व ते स्वतः तुकोबांचे भेटीला वस्त्रे, भूषणे, अलंकार, मोहरा घेऊन सेवकांसह लोहगावला आले, ते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले -
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥३॥
तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.
तुकोबांचे मुख्य १४ टाळकरी
१. शिवबा कासार - लोहगाव.
२. तुकया बंधू कान्होबा.
३. संताजी तेली जगनाडे - तुकोबाचे अभंग लेखक.
४. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव),
५. मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.
६. कोंडोपंत लोहकरे - लोहगाव.
७. गवार शेट वाणी - सुदुंबरे.
८. मल्हारपंत कुलकर्णी - चिखली.
९. आबाजीपंत लोहगावकर.
१०.रामेश्वरभट्ट बहुळकर.
११.कोंडपाटील, लोहगाव.
१२.नावजी माळी - लोहगाव.
१३.महादजीपंत कुलकर्णी
१४.सोनबा ठाकूर
कही निवडक अभंग
1) अणुरेणियां थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
2) ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥४॥
3) आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें
आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें ।
शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जिवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका ह्मणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ॥३॥
4) कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥
कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका ह्मणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटो ना करावा परता जीवा ॥४॥
5) चंदनाचे हात पाय ही चंदन
चंदनाचे हात पाय ही चंदन ।
परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥
तुका ह्मणे तैसा सज्जनापासून ।
पाहतां अवगुण मिळेचि ना ॥३॥
6) खेळ मांडीयेला वाळवंटी घाई.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥
होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥
7) आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
8) वाळो जन मज म्हणोत शिंदळी ।
वाळो जन मज म्हणोत शिंदळी ।
परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक जालियें उदास ।
नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां ।
म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
9) सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ ।
सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ ।
तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार ।
रातलों या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं ।
औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
10) मरणाही आधीं राहिलों मरोनी ।
मरणाही आधीं राहिलों मरोनी ।
मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥
आतां तुह्मी पाहा आमुचें नवल ।
नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥
तुका म्हणे तुह्मी भयाभीत नारी ।
कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥३॥
11) आपुलिया हिता जो असे जागता ।
आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण ।
आणीक चिंतन विठॊबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
12) जेविले ते संत मागें उष्टावळी ।
जेविले ते संत मागें उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करूनी झाडा ॥१॥
सोवळ्या ऒंवळ्या राहिलों निराळा ।
पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें ।
हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुस-यातें आह्मी नाहीं आतळात ।
जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथॆं कोणीं कांही न धरावी शंका ।
मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड ।
पुरविलें कोड नारायणें ॥५॥
बाह्य दुवे
- श्री संत तुकाराम महाराज मंदिर टाकळगव्हाण, ता.पाथरी, जि.परभणी, महाराष्ट्र राज्यविषयक बहुभाषी संकेतस्थळ
- संत तुकाराम महाराज माहीती विषयक बहुभाषी संकेतस्थळ
- मराठीचे मानदंड संत तुकाराम महाराज - मराठीमाती
- संत तुकारामांविषयीचे एक संकेतस्थळ
- संत तुकारामांविषयी
- Wikisource येथील तुकाराम गाथा
- [१]
- सावळे सुंदर रूप मनोहर - मराठीमाती
- http://santeknath.org/abhasakachya%20pratikriya.html
- संत तुकाराम - अप्रसिद्ध अभंग विदागारातील आवृत्ती
- संत तुकाराम समग्र साहित्य
- *मराठी माहिती पोर्टल -https://marathiinfopedia.co.in/2018/05/26/sant-tukaram-maharaj/
संदर्भ
- ^ "तुकाराम गाथा".
- ^ संपादक घुले, पांडुरंग अनाजी, ह्. भ्. प्. (२०१७). श्री संत तुकाराम महाराजांची गाथा. श्री क्षेत्र आळंदी: श्री संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन संस्था.
0 Comments